मालमत्ता कराच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर लागणार २ टक्के विलंब दंड!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप वर्ष २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरला नाही, त्यांच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर प्रति महिना २ टक्के विलंब दंड लागू झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातून देण्यात आली.
तसेच दुसऱ्या सहामाहीतील म्हणजेच ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळातील मालमत्ता कराच्या बिलावर लवकरच २ टक्के विलंब दंड लागू होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा करून अतिरिक्त भुर्दंड दंड टाळावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
महापालिकेच्या वतीने मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याबाबत सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती देखील महापालिकेने जाहीर केल्या होत्या. विविध सवलतींचा फायदा घेत तसेच महापालिकेकडून येणाऱ्या जनजागृतीला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ७ लाख ३२ हजार मिळकतींपैकी ४ लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कराचा भरणा केला असून १ एप्रिल २०२५ ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण ६३९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.
थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून, थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन मोहिमेला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद समाधानकारक असला, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मालमत्ता कराचा वेळेत होणारा भरणा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता तात्काळ कर भरणा करावा. थकबाकी रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
— पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका




















