अनुप मोरे अनुपस्थित… तरीही ‘मोरे-मय’ मेळावा; कार्यकर्त्यांच्या घोषणांनी गाजला प्राधिकरण
विश्वास, निष्ठा आणि संघटनेची ताकद — प्राधिकरणातील कार्यकर्ता मेळाव्याने दिला भाजपच्या एकतेचा संदेश

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अनुपस्थितीने उपस्थितीपेक्षा चर्चाच जास्त रंगली. मुख्य संयोजक म्हणून त्यांचे नाव आमंत्रणपत्रिका आणि बॅनरवर झळकत असतानाही, तांत्रिक कारणास्तव ते कार्यक्रमास येऊ शकले नाहीत. तरीसुद्धा, मेळाव्यातील वातावरण मात्र पूर्णपणे ‘मोरे-मय’ राहिले.
कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी जाहीर केले की, “अनुप मोरे काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.” मात्र, या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणांचा जल्लोष आणि त्यांच्यावरील निष्ठा स्पष्टपणे जाणवत होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी “जहां भरोसा होता है, वहां मौजूदगी की जरूरत नहीं होती” हे वाक्य सार्थ ठरवले.
विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १५ मधील सर्व इच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून हा मेळावा आयोजित करण्यात आला.आणि त्यामुळे हा पिंपरी-चिंचवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलाच असा अनोखा उपक्रम ठरला. कार्यकर्ते आणि पदाधिकारी दोघांनीही “अनुप मोरे देतील ते उमेदवार आम्हाला मान्य राहतील,” अशी स्पष्ट भूमिका घेत, त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवला.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही एकमुखाने सांगितले की, “अनुप मोरे यांनी काळजी करू नये, आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत.” या प्रसंगातून त्यांच्या तळागाळातील पकडीचे आणि लोकप्रियतेचे आणखी एक प्रत्यंतर मिळाले.
दरम्यान, भर पावसातही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रभाग क्रमांक १५ (आकुर्डी, निगडी, प्राधिकरण) येथील भाजप कार्यकर्ता मेळावा यशस्वी केला. बुथप्रमुख, शक्तीप्रमुख, महिला, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला. या उपस्थितीतून पक्षाने आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे चित्र दिसले.
भर पावसातही उसळलेल्या गर्दीत प्रभाग क्रमांक १५ (आकुर्डी, निगडी, प्राधिकरण) येथील भाजप कार्यकर्ता मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यातून पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
बुथप्रमुख, शक्तीप्रमुख, महिला, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपच्या संघटनेची ताकद दाखवून दिली. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, महामंत्री मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, भाजपा सचिव राजेंद्र बाबर, माजी महापौर आर.एस. कुमार, तसेच विजय शिनकर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इनामदार, समीर जावळकर, संदीप काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात आमदार उमा खापरे म्हणाल्या, “विरोधकांनी भाजपला लेचेपेचे समजू नये. भाजप हा एकसंघ पक्ष असून, ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमचे ब्रीद आहे. प्रभाग १५ मधील सर्व चारही जागा आम्ही जिंकणार, याबाबत आम्ही ठाम आहोत.”
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले, “हा फक्त प्रभागाचा नव्हे, तर संपूर्ण शहराचा मेळावा ठरला आहे. अनुप मोरे यांनी पक्षाची प्रतिमा जपली आहे; त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे.”
आमदार अमित गोरखे म्हणाले, “पावसातही कार्यकर्त्यांची उपस्थिती हीच भाजपची खरी ताकद आहे. हा मेळावा संघटनेच्या एकतेचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे.”
माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी प्रभागातील विकासकामांचा उल्लेख करत सांगितले की, “२४x७ पाणी योजना, सांडपाणी प्रकल्प, मेट्रो कामे आणि उद्यान उभारणी ही सर्व महत्त्वाची कामे भाजपच्या पुढाकाराने साकार झाली असून, पक्षाच्या नेतृत्वाने विकासाचा वेग कायम ठेवला आहे.”
या मेळाव्याने प्रभाग १५ मध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी निवडणुकीत प्रभागातील सर्व जागा जिंकण्याचा पक्षाचा आत्मविश्वास अधोरेखित झाला.




















