तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत शहर विकासकामांचा आढावा: तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश
30 मे पर्यंत संपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करा-आमदार सुनील शेळके यांची सुचना

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे आज बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उर्वरित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या. प्रस्तावित रस्ते कामांबाबतही चर्चा झाली.
शहरातील कचरा व्यवस्थापन, नाले सफाई व अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना नियमशीर व शिस्तबद्ध काम करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या.
शहरात एकूण ६ ठिकाणी नव्याने बस थांबे उभारण्यात येणार असून जिजामाता चौक, स्टेशन चौक व मच्छी मार्केटजवळ चार युनिटचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या मोकळ्या जागा तसेच सोसायट्यांच्या ओपन स्पेसमध्ये सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तळ्यापासून स्मशानभूमीपर्यंत ओढ्याची स्वच्छता करून त्या परिसरात फुटपाथ/जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम आणि बाकड्यांची उभारणी केली जाणार आहे.
शहरात बाहेरून येणाऱ्या व्यसनाधीन मुलांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांनी देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करून नागरिकांच्या गैरसोयी टाळाव्यात, याचीही विशेष दखल घेण्यात आली.









