उद्योगमहर्षी रतन टाटा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त टाटा मोटर्सच्या कामगारांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली
माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयात केले अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टाटा मोटर्स उद्योग समूहातील सर्वसामान्य कामगारांचे दैवत, उद्योगमहर्षी, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त टाटा मोटर्सच्या कामगारांनी मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकत्र येत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
या आदरांजली कार्यक्रमात मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत जाधव, महेंद्र गायकवाड, धोंडीराम कुंभार, महादेव कांबळे, गोविंद वाल्हेकर, संजय भोसले, सुरेश मांडके, बालाजी पांचाळ, रमाकांत मुंढे, बापूसाहेब चव्हाण, दत्ता भोसले, विजय जामोदकर, शीदराम पांचाळ, प्रमोद शिंदे, अनुरथ शेरखाने आणि प्रताप गोळे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्रिभुवन म्हणाले की, रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नव्हते, तर ते सर्वसामान्य कामगारांच्या मनातील प्रेरणास्थान होते. त्यांनी टाटा ग्रुपला जागतिक पातळीवर नेऊन नॅनो कारसारख्या क्रांतीकारी प्रकल्पांना आकार दिला. कामगारांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्य मानले. रतन टाटा यांच्या स्वप्नांना पुढे नेण्याचे आणि त्यांच्या मूल्यांना जपण्याचे काम आम्ही यापुढे करू.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली नाही, तर सामाजिक कल्याण, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यातून देशाप्रती त्यांची खोल निष्ठा आणि प्रेम दिसून येते. त्यांनी टाटा ट्रस्ट्सच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांना पाठबळ दिले आणि भारतीय उद्योगजगताला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले, असेही त्रिभुवन यावेळी म्हणाले.













