पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निकालात पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधून भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. या प्रभागातून भाजपचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ठरले असून, मतदारांनी पुन्हा एकदा विकास आणि विश्वासाला कौल दिल्याचे चित्र दिसून आले.
या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी १७,५८९ मते, कुंदा संजय भिसे यांनी १७,७८४ मते, तर अनिता संदीप काटे यांनी १४,८३२ मते मिळवत विजय संपादन केला. तिन्ही उमेदवारांच्या विजयामुळे प्रभाग २८ मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.
प्रचारादरम्यान स्थानिक विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांशी थेट संवाद यावर भर देण्यात आला होता. या मुद्द्यांना मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेषतः सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मेहनत या विजयामागील महत्त्वाची कारणे ठरली.
विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली. “हा विजय केवळ आमचा नसून पिंपळे सौदागरच्या जनतेचा आहे. नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या निकालामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे राजकीय बळ अधिक वाढले असून, आगामी काळात महापालिकेतील भूमिका अधिक प्रभावी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

















