पाच लाखांवरील थकबाकीदारांवर जप्ती कारवाई अटळ

पिंंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी जप्ती मोहिम हाती घेतली आहे. नुकतीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी मालमत्ता कर आकारणी व वसुली विषयक आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आणि सहायक आयुक्तांनी थकबाकीदारांच्या वसुलीबाबत पहिल्या टप्प्यात ५ लाखांवरील थकबाकीदारांवर जप्ती मोहिम राबविण्याबाबत सूचना दिल्या. २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जप्तीची कारवाई राबवली जाणार असल्याचे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
शहरात ५ लाखांवरील एकूण ६९९ थकबाकीदार थकबादीर आढळून आले आहेत. या थकबाकीदारांकडील थकबाकी रक्कम ९६ कोटी रुपये इतकी आहे.
थकबाकी वसूल करण्यासाठी विभागीय कार्यालय निहाय पथके तयार करण्यात आली असून, येत्या काही थकबाकीदारांना थकित रक्कम भरण्याबाबत समज देऊन देखील कर न भरल्यास प्रत्यक्ष मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.जप्ती कारवाईचा दर दोन दिवसांनी सहायक आयुक्त अविनाश शिंदे आढावा देखील घेणार आहेत.
५ लाखांवरील थकबाकीदारांची विभागनिहाय थकबाकीदारांची संख्या
चिखली – 128
कस्पटे वस्ती – 117
वाकड – 91
थेरगाव – 82
मनपा भवन – 51
सांगवी – 30
पिंपरी वाघेरे – 29
आकुर्डी – 22
मोशी – 20
भोसरी – 18
मनपा भवन – 51
चिंचवड – 35
किवळे – 34
फुगेवाडी दापोडी – 10
चर्होली – 8
दिघी बोपघेल – 8
निगडी प्राधिकरण – 7
तळवडे – 5
पिंपरी नगर – 4
५ लाख रुपयांवरील मालमत्ता कर थकबाकीदारांवर कोणतीही शिथिलता न दाखवता थेट जप्ती कारवाई केली जाणार आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरल्याने महापालिकेकडे हा निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. विभागीय कार्यालय कठोर कारवाई उद्यापासून सुरु केली जाणार आहे तरी नागरिकांना वेळेत थकबाकी भरुन कटू कारवाई टाळावी
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
महापालिकेकडून नागरिकांना कर भरण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत मालमत्ता करावर विशेष सवलतही देण्यात आली आहे . मात्र, काही मोठे थकबाकीदार अद्याप कर भरत नसल्यामुळे कारवाईच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपयांवरील थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
अविनाश शिंदे , सहायक आयुक्त , कर संकलन विभाग पिंपरी-चिंचवड महापालिका















