वाहतूक कोंडी, स्वच्छतागृह तसेच केंद्राची स्वच्छता आदी तक्रारी नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ४९ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ४, ३, ८ , ८ , ४, ६ , ३ आणि १३ अशा एकूण ४९ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतुकीच्या समस्या, गणेशोत्सव काळातील रस्त्यावरील मंडप हटविणे, गटारांची दुरुस्ती, शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, स्वच्छतागृह तसेच केंद्राची स्वच्छता आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
या उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार होईल, तसेच शहरातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.














