पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीसाठी आज, मंगळवार (दि. ११) रोजी सकाळी प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमधील इच्छुक संभाव्य उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सोडतीनंतर सर्वच पक्षांच्या निवडणूक तयारीला वेग येणार असून स्थानिक राजकारणाची दिशा ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान प्रभागनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चित करून प्रस्ताव आयोगाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
त्याअनुषंगाने सोमवारी (दि. १०) प्राधिकृत अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची रंगीत तालीम पार पडली. आज मुख्य सोडत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.
शहरातील प्रभागरचना बहुतांश २०१७ प्रमाणेच ठेवण्यात आली असली तरी केवळ तीन प्रभागांमध्ये झालेल्या अंशतः बदलाचा परिणाम आरक्षण सोडतीत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन प्रभागांमध्ये कोणत्या वर्गासाठी आरक्षण येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
