पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ११) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली. आरक्षणाचा पडदा पडताच, शहराच्या राजकीय वातावरणात ‘हुर्रे-अरेरे’चा माहोल निर्माण झाला. काहींसाठी आनंदाचा क्षण ठरला, तर काहींच्या चेहऱ्यावर निराशेची छाया उमटली.
एकूण ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ही सोडत पार पडली. खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात माजी नगरसेवक, इच्छुक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी हजेरी लावली होती. प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर होताच टाळ्यांचा कडकडाट, आनंदाचे जल्लोष आणि काही ठिकाणी नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आनंदातच कार्यकर्त्यांना “त्वरित कामाला लागा” अशा सूचना दिल्या, तर काही जण शांतपणे बाहेर पडताना दिसले.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सोडतीची नियमावली स्पष्ट केली. पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रियेवर महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहआयुक्त मनोज लोणकर आदी अधिकारी उपस्थित होते.
आरक्षण सोडतीदरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीचा विचार करून प्रेक्षागृहाबाहेर मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बाहेर उपस्थित नागरिकांनाही संपूर्ण प्रक्रिया थेट पाहता आली.
राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण सोडतीची अंमलबजावणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणे अपेक्षित आहे.
आरक्षण प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडली —
1️⃣ अनुसूचित जाती (एससी) व त्यातील महिलांसाठी जागा
2️⃣ अनुसूचित जमाती (एसटी) व त्यातील महिलांसाठी जागा
3️⃣ ओबीसी व ओबीसी महिलांसाठी आरक्षण
4️⃣ सर्वसाधारण (खुल्या) आणि महिलांसाठी आरक्षण
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एससी, एसटी, ओबीसी तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ श्रेणींतील प्रभागांमधून एकूण ३५ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरल्या.
संपूर्ण वातावरणात ‘राजकीय धाकधूक’ आणि ‘नव्या समीकरणांची सुरुवात’
या सोडतीनंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. इच्छुकांसाठी धावपळ, गणित मांडणी आणि प्रचाराची रणनीती ठरविण्याचा हंगाम आता अधिकृतपणे सुरू झाला आहे.
