कामगारांच्या प्रबोधनासाठी तुकोबारायांच्या पालखीमध्ये सहभाग
श्री क्षेत्र देहूपासून आकुर्डीपर्यंत कामगार व महिलांची प्रबोधन दिंडी उत्साहात

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळ्यात “कामगार प्रबोधन दिंडी”चे आयोजन करण्यात आले.श्री क्षेत्र देहूपासून आकुर्डी तुळजा भवानी मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीत शेकडो कामगार, व महिला त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी झाले.
या दिंडीत कामगारांमध्ये पाणी बचतीचा संदेश,व्यसनमुक्तीचे महत्त्व,आरोग्य,स्वच्छतेबाबत तसेच कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना मिळणाऱ्या योजना याची जनजागृती करण्यात आली. विशेष आकर्षण ठरले ते संतांची वेषभूषा करून सहभागी झालेले गुणवंत कामगार. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात श्रीकांत व संगीता जोगदंड दांपत्य,तुकाराम महाराजांच्या रूपात प्रकाश घोरपडे,नामदेव महाराजाच्या वेशात शामराव गायकवाड आदीं गुणवंत कामगारांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले.
यावेळी जाधववाडी येथील कामगार भजनी मंडळाने अभंग व गवळणी सादर केल्या. कामगार साहित्यिकांनी स्फूर्तीदायी कविता सादर करून वातावरण भक्तिमय केले.
या दिंडीस मा.मनोज पाटील (सहाय्यक कल्याण आयुक्त, पुणे गट),प्रख्यात व्याख्यात्या शारदा ताई मुंडे,ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे,केंद्र अधीक्षक संजय थोरात,कल्याण निरीक्षक संदीप गावडे,केंद्र संचालक प्रदीप बोरसे,रुपाली मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे,उपाध्यक्ष तानाजी एकोंडे, कामगार भूषण राजेंद्र वाघ आणि मंडळाचे सर्व गुणवंत कामगार संजय चव्हाण,संदीप रांगोळे,मच्छिंद्र कदम,शिवराज शिंदे,प्रकाश चव्हाण,दत्तात्रय देवकर,रामदास सैंदाने,मोहम्मदशरीफ मुलानी, कुटुंब व अधिकारी व कर्मचारी यांनी केले.
कार्यक्रमास सुमारे १४० ते १५० कामगार,कुटुंबीय व सेवानिवृत्त कामगार मोठ्या संख्येने पारंपरिक वेषामध्ये उपस्थित होते.












