पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक २८ (रहाटणी–पिंपळे सौदागर) येथे आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ जाहीर केला आहे. रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज मंदिर, पिंपळे सौदागर येथे हा प्रचार शुभारंभ सोहळा पार पडणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमामुळे प्रभाग २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखली जाणार आहे.
या प्रभागातून श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, सौ. शीतल विठ्ठल (नाना) काटे, सौ. मीनाक्षी अनिल काटे आणि सौ. सायली उमेश काटे हे प्रमुख चेहरे पुढे येत असून, स्थानिक विकास, नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून या सर्वांनी परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या भव्य प्रचार शुभारंभाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमातून प्रभाग २८ मध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, येत्या काळात इतर पक्षांच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.
