पीके चौक, पिंपळे सौदागर येथे भीषण अपघात — दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, माजी नगरसेवक नाना काटे यांनी केली तत्काळ मदत

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — आज सकाळच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एक दुर्दैवी व भीषण अपघात झाला. चिचवड येथील एका इसमाने एक्टिवा दुचाकीवरून कोकणे चौकाच्या दिशेने जात असताना, एका RMC (रेडी मिक्स काँक्रीट) गाडीखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत, सांगवी पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि ॲम्बुलन्स यांना घटनेबाबत माहिती दिली. अल्पावधीतच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. काटे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन मदतीचे काम समन्वयाने पार पाडले.
अपघातानंतर, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून, रस्त्यावरील बेशिस्त जड वाहनांची वाहतूक ही वाढत्या अपघातांचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक काटे यांनी याच पार्श्वभूमीवर सांगवी वाहतूक पोलीस निरीक्षक आणि सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना अशा जड वाहनांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे














