कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला भजनी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदिरानगर, चिंचवड येथील शिवलिंग मंदिरात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या महिला भजनी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ४७ संघांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष उत्साह लाभला. भक्तीमय वातावरणात झालेल्या या स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विजेते आणि विशेष सन्मान
स्पर्धेत आकुर्डी येथील राधाकृष्ण महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर, शिवशक्ती महिला भजनी मंडळ, संत तुकाराम नगर, पिंपरी यांनी द्वितीय क्रमांक आणि चिंचवड येथील संतोषी मा महिला भजनी मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला.
उत्तेजनार्थ बक्षिसे मिळालेल्या संघांमध्ये पसायदान महिला भजनी मंडळ, दळवीनगर, चिंचवड; सावतामाळी महिला भजनी मंडळ, कृष्णानगर; वाल्हेश्वर महिला भजनी मंडळ, वाल्हेकरवाडी; आणि दुर्गादेवी महिला भजनी मंडळ, पिंपळे गुरव यांचा समावेश होता.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये श्री वैभव रायकर यांना उत्कृष्ट तबलावादनासाठी सन्मानित करण्यात आले. शरयू कुलकर्णी यांनी सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादकाचे बक्षीस पटकावले, तर जोगेश्वरी महिला भजनी मंडळाच्या मोनिका नखाते यांनी सर्वोत्कृष्ट मृदुंग वादन करून बक्षीस मिळवले.
या स्पर्धेसाठी ह.भ.प. मधुकरराव मोरे (दादा) व ह.भ.प. सुरेखाताई कामठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन सौ. नीलम शिंदे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केले. बक्षीस वितरण सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आयोजकांनी कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या कार्याची आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची आठवण करून दिली. तसेच, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि सलोखा वाढीस लागतो, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला यावेळी भाऊसाहेब भोईर, मधुकर महाराज मोरे, दत्तात्रय साकोरे, अशोक काळभोर शिरवले काका इ. तासेच स्थानिक नागरिक, भाविक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




















