ताज्या घडामोडीपिंपरी
“रस्ता अडवला तर थेट गुन्हा दाखल करा” – उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रशासनाला इशारा
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर उपमुख्यमंत्र्यांचा कठोर पवित्रा

हिंजवडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
विप्रो कंपनीच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर काही लोकांकडून होणारा अडथळा पाहून अजित पवारांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला की, “कोणी रस्ता अडवला, तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि कारवाई करा.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारी कामात अडथळा सहन केला जाणार नाही. ज्यांची जमीन आहे त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, पण सार्वजनिक हितासाठी रस्त्याचे काम थांबवू नका.”
दौऱ्यात अजित पवारांनी क्रोमा चौकातील मेट्रो स्टेशनच्या सरकत्या जिन्याच्या चुकीच्या उभारणीबाबतही नाराजी व्यक्त केली. यामुळे रस्ता अरुंद होऊन दररोज हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यावर तातडीने सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी पीएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाला दिले.
स्थानिक आयटी अभियंत्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले की, “पूर्वी रस्ता मोठा होता, मात्र मेट्रोच्या कामामुळे आता तो अरुंद झाला आहे. त्यामुळे नोकरीला जाताना दररोज वेळ वाया जातो.” या तक्रारींवर गांभीर्याने प्रतिक्रिया देत अजित पवारांनी परिस्थिती सुधारण्याचं आश्वासन दिलं.
या दौऱ्यानंतर हिंजवडीतील रस्ते आणि वाहतूक समस्यांवर काही ठोस निर्णय घेतले जातील, अशी आशा स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचारी व्यक्त करत आहेत.













