पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने मोठा आणि महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेतला आहे. शहर निवडणूक प्रभारी म्हणून खा. डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हे हे अभ्यासू, प्रभावी वक्ते आणि जनसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तर आमदार रोहितदादा पवार हे संघटन कौशल्य, आक्रमक भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक यामुळे पक्षातील विश्वासार्ह चेहरा मानले जातात. या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणूक प्रभारी म्हणून दोन्ही नेते शहरातील सर्व प्रभागांमध्ये दौरे करणार असून, स्थानिक पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. उमेदवार निवड, प्रभागनिहाय रणनीती, आघाडी-बांधणी आणि प्रचार यंत्रणेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
विशेषतः भाजप व सत्ताधारी गटाविरोधात प्रभावी राजकीय लढा उभारण्यासाठी ही नियुक्ती निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
पिंपरी-चिंचवड हे राज्यातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असून, येथे होणाऱ्या राजकीय घडामोडींचे राज्यभर पडसाद उमटतात. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने अनुभवी, तरुण आणि आक्रमक नेत्यांवर जबाबदारी सोपवत स्पष्ट संदेश दिला आहे की, यंदाची निवडणूक राष्ट्रवादीसाठी ‘करो या मरो’ची ठरणार आहे.
या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “शहरात परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज” अशी भावना सर्व स्तरांत दिसून येत आहे. आगामी काळात या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

















