Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड येथे घडला आहे. या प्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात ३६ वर्षीय पीडित महिलेने २६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला भाजपची सक्रिय पदाधिकारी असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्यादी महिला त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या असता, संशयितांनी बंगल्याबाहेर त्यांना धमकावले. “आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू येथे का आलीस? तुला मारून टाकू. अनुप मोरेनेच तुला संपवायला सांगितले आहे,” अशा शब्दांत धमकी दिली गेली, असे फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर काही महिलांनी फिर्यादीच्या गाडीला घेराव घातला, तर तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिस ठाण्यातही त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिस ठाण्याबाहेर पडताच शंभर जणांच्या टोळक्याने पुन्हा त्यांना धमकावले.

दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीत सुरुवातीला अनुप मोरे यांचे नाव राहून गेले होते. मात्र, संबंधित महिलेकडून आक्षेप नोंदवल्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की “अनावधानाने नाव राहून गेले होते,” आणि त्यानंतर अनुप मोरे यांचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील करत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version