पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद जयवंत नढे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार प्रचारामुळे संपूर्ण प्रभाग ढवळून निघाला असून ठिकठिकाणी श्री. नढे यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्ते तसेच तरुण वर्गामध्ये मोठे नवचैतन्य संचारले असून प्रचाराला वेग आला आहे.
आज सकाळपासून विनोद नढे यांनी कोपरा बैठका घेत नागरिकांशी थेट संवाद साधला. घराघरांत जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच आगामी काळातील विकासात्मक दृष्टीकोन मांडला. या गाठीभेटींमुळे काळेवाडी प्रभाग अक्षरशः भाजपमय झाल्याचे चित्र दिसत आहे.
सायंकाळच्या सत्रात श्री. नढे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कोकणे नगर येथील अयोध्या कॉलनी तसेच श्रीकृष्ण कॉलनी क्रमांक १, २ आणि ३ या परिसरात घरोघरी जाऊन प्रचारपत्रकांचे वाटप केले. या वेळी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, औक्षण करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी थेट विजयाच्या शुभेच्छा दिल्याने वातावरण अधिकच उत्साही झाले.
कोकणे नगर येथील मृत्युंजय प्रतिष्ठान यांच्या वतीने विनोद नढे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर गणेश मंदिर येथे गणपतीची आरती करून प्रचाराचा दिवस भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
एकूणच, काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये विनोद नढे यांचा प्रचार वेगाने पुढे जात असून वाढता जनसमर्थन आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता भाजपची ताकद दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
