भाजप उमेदवारीच्या शर्यतीत प्रभाग २८ मधून अनिता काटे सर्वात बलवत्तर दावेदार

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणूक २०२६ च्या तयारीला वेग आला असताना प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर) येथून भाजपमधील इच्छुकांच्या शर्यतीत अनिता संदीप काटे यांचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. मंगळवारी (दि. ०९) त्यांनी सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारीसाठीचा अधिकृत अर्ज भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे सुपूर्त करून निवडणूक प्रक्रियेला औपचारिक सुरुवात केली.
अनिताताई काटे या गेल्या काही वर्षांपासून प्रभाग २८ मध्ये सातत्याने सामाजिक कामात सक्रिय आहेत. स्थानिक समस्यांवर वेळीच आवाज उठवणे, महिलांना संघटित करणे, सोसायटी पातळीवर ठोस जनसंपर्क ठेवणे आणि समाजातील विविध घटकांना जोडण्याचे त्यांचे प्रयत्न यामुळे कार्यकर्ते व स्थानिक मतदारांमध्ये त्यांची मजबूत ओळख निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनात्मक शक्तीचा प्रत्यय दिला.
पक्षातही त्यांच्या नावाबाबत सकारात्मक आणि अनुकूल वातावरण निर्माण झाले असून शहराध्यक्षांसह वरिष्ठ नेतृत्वाचा पाठींबा मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग २८ मध्ये अनिताताई काटे यांची अधिकृत उमेदवारी निश्चित मानली जात असल्याचे राजकीय वर्तुळातील हालचालींवरून स्पष्ट होते.
प्रभागातील मजबूत संपर्क, जनाधार आणि सातत्याने केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्या भाजपच्या प्रमुख दावेदार म्हणून उदयास आल्याचे निरीक्षकांचे मत आहे. महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्यांच्या उमेदवारीबाबतची चर्चा अधिकच जोर धरताना दिसत आहे.




















