चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाला चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे चिंचवड विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
या वेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात कोऱ्हाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नेते अजित गव्हाणे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,
“अनंत कोऱ्हाळे हे लढवय्या व जनसंपर्कात मजबूत असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार आहे.”
तर नाना काटे म्हणाले,
“अजितदादांच्या विकासाभिमुख शैलीने प्रेरित होऊन शहरात आणखी अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश लवकरच होतील. कोऱ्हाळे यांचा पक्षप्रवेश हा त्या प्रक्रियेची सुरुवात आहे.”
अनंत कोऱ्हाळे यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की,
“चिंचवडमधील जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच योग्य व्यासपीठ आहे. पक्षाच्या भूमिकेनुसार प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा संकल्प आहे.”
या प्रवेशानंतर चिंचवडमधील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
