पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे निलख परिसरातून पुणे स्टेशन, हडपसर आणि स्वारगेट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धावणारे पीएमपीएमएलचे प्रमुख बस मार्ग अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही सेवा तात्काळ पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
पिंपळे निलखसाठी दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख आधार असलेल्या बस क्रमांक 100 (पुणे स्टेशन), 333 (हडपसर) आणि 21 (स्वारगेट) या मार्गावरील सेवा बंद झाल्याने अनेक विद्यार्थी, नोकरीला जाणारे नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांवर मोठा ताण आला आहे. बस सेवा बंद असल्यामुळे संबंधितांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी महागडी खासगी वाहतूक वापरण्याची वेळ येत असून, त्यातून अधिकचा खर्च, अधिकचा वेळ आणि मानसिक त्रास निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘आप’चे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाकडे बस सेवा तातडीने व विनाविलंब सुरू करण्याची मागणी केली आहे.
काळे म्हणाले,
“नागरिकांची ही गैरसोय त्वरित दूर झाली पाहिजे. बस मार्ग पूर्ववत न झाल्यास आम आदमी पार्टी नागरिकांसह रस्त्यावर उतरेल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.”
या इशाऱ्यामुळे पिंपळे निलख परिसरातील वाहतूक आणि स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
