व्यायाम आणि ध्यानधारणा मानसिक संतुलन साधते – सर्वरीश चंद्रा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजच्या या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरामय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आहे.
दररोज योगा केल्याने शारीरिक आरोग्य उत्तम राहते, तर ध्यानधारणा केल्याने मन शांत आणि एकाग्र राहते, इतरांशी चांगला संवाद साधणे शक्य होते. आकलनक्षमता वाढते, आपल्यातील सृजनशीलतेचा विकास होण्यास मदत होते, कामाच्या ठिकाणचा तान कमी होतो, स्वास्थ्य आणि संपन्नतेचा अनुभव येतो, असे प्रतिपादन विंझरे प्रायव्हेट लिमिटेडचे हेल्थ कोच मा. सर्वरीश चंद्रा यांनी व्यक्त केले. महात्मा फुले महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी योगा व मेडिटेशन या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी मा. उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, मा. महेश गीते आणि मा. नेहा डोंगरे यांची व्याख्याने झाली. प्रात्यक्षिके घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. माधव सरोदे होते. मानसिक संतुलन आणि शारीरिक आरोग्य राखणे सध्याच्या काळात गरजेचे ठरत आहे. तेव्हा व्यायाम ध्यानधारणा आणि संतुलित आहार हीच निरामय जीवनाची गुरुकिल्ली आहे, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी केले. उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप नन्नावरे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी यांनी केले.