अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कसरती सादर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कसरती सादर करीत साजरा करण्यात आला.
शैक्षणिक आणि शारीरिक विकासाला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, ज्योती मोरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध कसरती करीत मानवी मनोरे, बॉक्सिंग, कुस्ती, योगासने, फुटबॉल या खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली. क्रीडा शिक्षिका सुषमा पवार व ज्योती मोरे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाविषयी माहिती सांगितली व खेळामुळे मिळणारे फायदे सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी मेजर ध्यानचंद यांचा जन्मापासूनचा जीवनपट उलगडला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केल्यास विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. प्रणव राव म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा दिन हा खेळ, शारीरिक तंदुरुस्ती आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो.
क्रीडाशिक्षिका सुषमा पवार, ज्योती मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.