आयुक्तसाहेब पिंपरी, थेरगाव, रहाटणीतील महापालिका प्रशासन खड्डे बुजवतात मग काळेवाडी दुर्लक्षित का?
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांचा आयुक्तांना परखड सवाल
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना महापालिका प्रशासनाकडून शहरभर खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये महापालिका प्रशासनाने रहाटणी, थेरगाव, पिंपरी या तिन्ही प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र या तीनही प्रभागाच्या मधोमध असलेल्या काळेवाडी प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे व्यक्त केली.
काळेवाडी प्रभागातील खड्ड्यांचा प्रश्नासह विविध मुद्द्यांवर शहर काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष सजी वर्की, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष जमीर शेख, जिल्हा युवक सरचिटणीस जिफिन जॉन्सन, वसीम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत चंद्रशेखर जाधव म्हणाले की, काळेवाडी प्रभाग हा जवळपास 50 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेला प्रभाग आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात दुर्लक्षित आणि अविकसित प्रभाग म्हणून ओळखला जातो. कारण जी विकासकामे काळेवाडी प्रभागाच्या आसपासच्या प्रभागांमध्ये महापालिकेच्या वतीने राबविण्यात येतात. त्या विकासकामांबाबतीत अद्यापही काळेवाडी प्रभाग वंचित आहे. सध्या काळेवाडी प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रभागात सद्यस्थितीत एकही रस्ता सुस्थितीत दिसून येत नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. वाहनचालकच नव्हे तर पादचारी, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांची डागडुजी केलेली आहे मात्र मागील एक-दोन पावसामध्ये डागडुजी केलेले खड्डेही पुन्हा उघडे पडले आहेत. त्यामुळे तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.
काळेवाडीतील पोलीस चौकीसमोर असलेले महापालिकेचे रुग्णालय. सदर रुग्णालय हे फक्त दोन लहान खोल्यांमध्ये सुरू असून ते रुग्णालय कमी आणि कोंडवडा जास्त वाटतो. लसीकरणाच्या दिवशी अनेक माता आपल्या नवजात बालकांना घेऊन याठिकाणी येतात मात्र जागेच्या कमतरतेमुळे ऐन पावसात आणि उन्हात त्या लहान बाळांना घेऊन त्या मातांना ताटकळत उभे राहावे लागते. गर्दीच्या वेळी तर अनेकदा महिलांना थेट मुख्य रस्त्यावर उभे राहावे लागते. त्यामुळे येजा करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका संभवतो. व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखाद्या सुसज्ज ठिकाणी सदर रुग्णालय हलविण्यात यावे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून काळेवाडी प्रभागातील यांसह विविध गंभीर विषयांकडे महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तरीही आपण व्यक्तिगत पातळीवर लक्ष घालून आपण प्रशासनाला तात्काळ यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चंद्रशेखर जाधव यांनी यावेळी आयुक्तांकडे केली.