विकास ही निरंतर प्रक्रिया; समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सक्षम – शेखर सिंह

चिखलीत ‘संवाद सोसायटीधारकांचा’ कार्यक्रमात आ. महेश लांडगे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाढत्या नागरीकरणात विकास प्रकल्प राबविणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पिंपरी चिंचवड मेट्रो शहराचा विकास झपाट्याने होत आहे. येथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या वेगाने पायाभूत सेवा सुविधा सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सक्षम आहे. विकास प्रकल्प राबवत असताना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याबाबत आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
चिखली, मोशी, चऱ्होली, पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने ‘‘संवाद सोसायटीधारकांचा’’ या कार्यक्रमात शेखर सिंह बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, मुख्य अभियंता मकरंद निकम, पोलीस प्रशासनाकडून डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, अमोल देशपांडे आदी उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले की, महानगरपालिका सोसायटीधारकांच्या तक्रारी बाबत संवेदनशील आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा काम करीत आहे. पाण्याची बचत आणि अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. ‘सोसायटीधारकांचा संवाद’ असा उपक्रम तीन ते चार महिन्यांतून एकदा व्हावा. या करिता प्रशासन प्रयत्नशील राहील.
प्रास्ताविक करताना संजीवन सांगळे यांनी सांगितले की, शहरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था स्थापन होत आहेत. यामधील सभासदांचे अनेक प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक होते. त्यासाठी २०१६ साली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनची स्थापना करण्यात आली. सोसायटी गृहनिर्माण अधिनियमाबाबत सोसायटी संचालित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे, विकासकाकडून अपुरी राहिलेली कामे पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया करणे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोसायटी धारकांच्या विविध अडचणी लोकप्रतिनिधीसमोर मांडून त्या सोडविण्यासाठी फेडरेशन सतत कार्यरत आहे. यामध्ये रस्ते, पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, मिळकत कराची समस्या यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी फेडरेशन काम करीत आहे. सोसायटी फेडरेशनच्या अंतर्गत १३६७ सोसायट्या आणि ४० हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणीकृत आहेत.
प्राधिकरण हद्दीतील प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्याबाबत निवडणूक आचारसंहीतेपूर्वी निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा, समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास, सोसायटीच्या आवारात वाईन शॉप अथवा दारु दुकानाला बंदी, परिसरातील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, बेकायदा पार्किंग या विषयावर चर्चा झाली. विकसकाला बांधकाम परवानगी देताना पूर्व तपासणी करावी. पब्लिक स्पेस, ॲमिनिटीज्, ओपन स्पेस, पार्किंग याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी करावी. सोसायटीधारकांना पायाभूत सोयी सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्याबाबत उपस्थित सभासदांनी मनोगत व्यक्त केले.









