संविधान भवनाच्या उभारणीसाठी वास्तू विशारद संस्थेला मंजुरी
– महानगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मान्यता
– आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारणीलाही चालना
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणाऱ्या संविधान भवनाच्या उभारणीसाठी वास्तू विशारद संस्थेच्या नियुक्तीला महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक वास्तुची पायाभरणी होणार आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित भारतीय संविधान भवन आता शहरवासीयांच्या दृष्टीक्षेपात आले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीतील पेठ क्रमांक ११ मधील खुली जागा क्र. २ क्षेत्र २५८९४.२ चौ. मी. हे संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे संविधान भवन उभारणीच्या कामाला आता महानगरपालिकेच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे. याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहराची ओळख शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीयदर्जाची होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेली भारतीय राज्यघटना अर्थात संविधान यासह जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतीय संविधानाचा प्रचार- प्रसार अन् जागृती करण्यासाठी भारतातील पहिले संविधान भवन हे ज्ञानमंदिर पिंपरी-चिंचवडमध्ये साकारत आहे, ही निश्चित शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सल्लागार नियुक्तीला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यानंतर निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी, अशी प्रशासनाला सूचना केली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.