रावेत येथील मस्ती की पाठशाळेत स्वातंत्र्यदिन साजरा
एक विद्यार्थी शिकला म्हणजे संपुर्ण कुटुंब समृध्द होते – नितीन फटांगरे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घरातील एका मुलाने शिक्षण घेतले तर ते कुटुंब पंचवीस वर्ष पुढे जाते. कारण एक पिढी साधारण पंचवीस वर्षांची असतें त्यामुळे शिक्षणाने फक्त एखादा मुलगा मुलगी समृद्ध होत नाही तर संपूर्ण कुटुंब समृद्ध होत असते, असे प्रतिपादन रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी केले.
रावेत येथील सहगामी फाउंडेशनच्या वतीने बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी मस्ती की पाठशाळा चालविण्यात येते. या शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी फटांगरे बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त आयपीएस सुरेश खोपडे, सहगामीच्या अध्यक्षा प्राजक्ता रूद्रावार, कार्याध्यक्ष रोशनी राय, उपाध्यक्ष अन्वर मुलाणी, सुधीर करंडे, रुपाली मुर्थी, टीना जॉन, अनिकेत ठोसर, श्रध्दा रावळ, हितेश रहांगडाळे, गार्गी नाटेकर, जयकिशन यादव, अर्चना राऊत, शीतल बुराण, निरंजन सोखी, हरिश कदम, श्याम भोसले, अनिता माळी, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
सुरेश खोपडे म्हणाले, आजकालची गुन्हेगारी वाढत चाललेली पाहून त्यावर आळा बसविण्यासाठी मुलांना योग्य वयात शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे तो भारताचा एक चांगला नागरिक बनू शकतो. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या उज्वल भविष्यांची वाटचाल करू शकतात. ——–
दिनेश रावळ शिष्यवृत्तीचे वाटप…
दिनेश रावळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल या भावनेने शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. दरवर्षी १५ आँगस्ट रोजी ही शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. प्रत्येकी तीन हजार रोख व सर्टिफिकेट असे या शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे. रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या हस्ते स्व.दिनेश रावळ शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी
रावेत येथील महापालिकेच्या शाळेत शिकणारे दिपक देविदास दुधमल, आरती अमरेश पवार, गगनकुमार राजू डांडे, मयुरी गणेश कुंभार हे मानकरी ठरले.