श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी यांच्याकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी यांच्यावतीने राबविल्या जाणार्या ‘आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय फीसाठी अर्थसाहाय्य’ या योजनेंतर्गत प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या पुढाकारातून पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे ८२ विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले.
निगडी प्राधिकरणातील स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त मंडळ सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे यांच्याहस्ते आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्या अध्यक्षतेखालील गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे प्रदीप पवार, साहित्यिक प्रा. डॉ. धनंजय भिसे, श्री मार्तंड देवस्थान – जेजुरीचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे ९ शाळांमधील सुमारे ८२ विद्यार्थ्यांना एकूण ₹ १५८०००/- आर्थिक मदतनिधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. आसराम कसबे यांनी प्रास्ताविकातून हे अर्थसाहाय्य खरोखर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी खातरजमा करण्यात आल्याचे सांगितले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हेमंत हरहरे यांनी शुभेच्छा दिल्या. चापेकर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी शिक्षक प्रतिनिधी या भूमिकेतून प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापर मनोगते मांडली. डॉ. अशोक नगरकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेतला. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.