विशाल काळभोर यांच्या मागणीला मोठे यश; मोहन नगरच्या जलतरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम सुरू
साडेतीन कोटी खर्च करून अत्याधुनिक पद्धतीचा होणार जलतरण तलाव
काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह आणि प्रसारमाध्यमांचे मानले आभार
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील बंद असलेला जलतरण तलावाचे काम सुरू करण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांनी पाठपुरावा केला. अखेर काळभोर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या जलतरण तलावाचे काम महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. याबद्दल काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत.
याबाबत काळभोर यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 14 मधील मोहननगर येथे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव आहे. मात्र, हा जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. या जलतरण तलावावर मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, लालटोपीनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर यासह आदी भागातील नागरिक, मुले पोहण्यासाठी येत होते. मात्र, हा तलाव कोरोनाच्या अगोदरपासून खोली कमी करण्याच्या नावाखाली बंद होता.
या तलावाचे काम करण्यासाठी आपण क्रीडा विभागाचे तत्कालीन उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांच्याशी दोन-तीन वेळा पत्रव्यवहार केला होता. तसेच त्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन जलतरण तलावाचे काम सुरू करण्याची विनंती केल्याचेही काळभोर यांनी म्हटले आहे.
———–चौकट ——
गेल्या दोन वर्षापासून मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश म्हणून या जलतरण तलावाच्या स्थापत्य विषयक सुधारणा करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या तलावाच्या कामाची वर्क ऑर्डर राहिली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच
या कामासाठी पुन्हा पाठपुरावा केला. त्यामुळेच जलतरण तलावाचे
काम सुरू करण्याचे
क्रीडा स्थापत्य विभागाने आदेश दिले आहेत.
———–चौकट——-
चार वर्षांपासून खेळाडू, शालेय मुले, नागरिकांची गैरसोय
मोहननगर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची सातत्याने गर्दी असायची. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडू, शालेय मुले, इतर नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या जलतरण तलावातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. आता या जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने काम करण्यात येणार आहे. या तलावावर महिला, मुलीही पोहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बंदिस्त तलाव करण्यात येणार आहे.
———चौकट———–
तलावाच्या नुतनीकरणासाठी साडेतीन कोटींचा खर्च
जलतरण तलावाचे पूर्णतः नुतनीकरण करण्यात येणार आहे. हा तलाव चार ते साडेचार फूट खोलीचा असणार आहे. तलाव बंदिस्तही करण्यात येणार आहे. यामध्ये बेबी पूलही असणार आहे. कामाची मुदत डिसेंबर 2025 पर्यंत असून साडेतीन कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.