ताज्या घडामोडीपिंपरीपुणेमहाराष्ट्र

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Spread the love

 

पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरली असून धरणक्षेत्रात होणाऱ्या सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार १६ क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. तसेच मुळशी धरणातूनही मुळा नदीपात्रात सायं ७ वाजता २७ हजार ६०९ क्युसेक विसर्ग करण्यात येत असल्याने या दोन्ही नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तास धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी, एकता नगर तसेच नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे. विशेषत: मुळा-मुठा संगमाजवळील भागात नदीपात्रातील विसर्गाचे प्रमाण जास्त असणार आहे.

महानगरपालिकेतर्फे नदीकाठच्या नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे नागरिकांना तात्पुरते स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आल्यास त्यास प्रतिसाद द्यावा. नदीपात्राजवळ जाऊ नये किंवा त्या परिसरात वाहने पार्कींग करू नये. जिल्ह्यातील इतरही भागातील धरणे भरली असून विविध धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.

जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आवश्यकता असल्यास तात्काळ मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कराच्या तुकडीला तयारीत राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. प्रशासनाची मदत व बचाव पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून विविध यंत्रणांना वेळोवळी सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button