TOGETHER FOR CHINCHWAD ;मी येतोय. तुमच्या सेवेसाठी, तुमची साथ, शुभेच्छा व आशीर्वाद हवेत नाना काटे यांची भावनिक साद
मागील दीड ते दोन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रीय असून देखील कारकिर्दीचे सिंहावलोकन करत असताना कायम सतावत असलेला प्रश्न म्हणजे माझं चुकलं तरी काय? आणि आता याच विषयांवर निसंकोचपणे आणि कोणताही आडपडदा न ठेवता नाना काटे मतदारांसोबत थेट संवाद साधत आहेत. तसेच नाना काटे यांच्या समर्थकांनी मतदार संघात याच आशयाचे लाखो पत्रकांचे वाटप केले आहे. त्यामुळे दोन वेळा झालेल्या निसटत्या पराभवातून अनुभवाचे धडे घेत मनामध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण करत, नियोजनबद्ध वाटचाल करत आगामी चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी नाना काटे यांनी दंड थोपटले आहेत.
२००७ साली नाना काटे यांनी पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक विकासकामे करत एके काळच्या काटेपिंपळे गावच पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत विकसित असलेले, सुंदर, देखणं आणि स्वच्छ पिंपळे सौदागरमध्ये रुपांतर केले. येथील टोलेजंग इमारती, गृहप्रकल्प, बाजारपेठ, रस्ते, मॉल, हॉस्पिटल, उद्याने आणि नियोजनबद्धरीत्या झालेला सर्वांगीण विकास पाहून आज पिंपळे सौदागरला युरोपियन सिटी म्हणून ओळखले जाते. अर्थात यामध्ये लोकप्रतिनिधी आणि स्थानिक भूमिपुत्र म्हणून नाना काटे यांचे मोठे योगदान आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यांच्या विकासकामांची पद्धत पाहून एक दूरदृष्टीचा नेता म्हणून नाना काटे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच २०१४ साली नाना काटे यांना पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीत उतरविले. परंतु त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र पराभवाने खचून न जाता सखोल आत्मपरीक्षण करत त्यांनी पुन्हा समाजाची नाळ अधिक घट्ट केली.
२०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षआदेश मानत नाना काटे पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. जेमतेम मिळालेला एक महिन्याचा कालावधी, त्यात समोरच्या उमेदवाराला असलेली सहनुभूती, मतदार संघातील राजकीय डावपेच अशा अवस्थेत देखील नाना काटे यांनी शड्डू ठोकून लक्षवेधी लाखभर मते मिळवली, मात्र यावेळी देखील त्यांचा निसटता पराभव झाला, त्यानंतर देखील ते थांबले नाहीत. पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी मतदार संघात पकड मजबूत केली. आणि आगामी विधानसभेत विजयाचे तोरण बांधण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली.
घराणेशाही असलेल्या दिशाहीन नेतृत्वामुळे सामान्य माणसाकडे दुर्लक्ष झालं. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेने शहराचा विकासाचा वेग मंदावला, वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होत गेला. वाहतूक कोंडीला कंटाळून अनेक आयटी कंपन्या आणि लहान मोठे उद्योग व्यवसाय स्थलांतरित झाले. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे आता यातून नियोजनबद्ध आराखडा तयार करून पुन्हा एकदा शहर विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी तसेच ज्याप्रकारे पुण्यातल्या कोरेगाव पार्कला लाजवेल असा विकासाचा नवीन पॅटर्न पिंपळे सौदागरने उभा केला आहे. अगदी त्याचप्रकारे चिंचवड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी पुन्हा एकदा जनतेच्या दारात येत असून आगामी चिंचवड विधानसभा मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.