सदिच्छा दूत म्हणून कार्य करणाऱ्या इन्फ्लूएन्सर यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील सदिच्छा दुतांचा सत्कार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
महापलिकेच्या वतीने नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच शहराच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध समाजमाध्यमांवरील आपल्या खाजगी खात्यांद्वारे प्रसिद्धी करणारे इन्फ्लूएन्सर अर्थात प्रभावक यांनी सदिच्छा दूत म्हणून प्रचार प्रसार केला. या कार्याची दाखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी चिंचवड येथील आटोक्लस्टर येथे इन्फ्लूएन्सर यांचा सत्कार केला, यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, पीसीएमसी स्मार्ट सारथी टीम आणि विविध क्षेत्रातील इन्फ्लूएन्सर उपस्थित होते.
यामध्ये प्रेरणात्मक चित्रफिती तयार करणारे पियुष सजगने यांचा मालमत्ता कर सवलत योजनेच्या प्रसिद्धीसाठी, सिने कलाकार स्वराज भोईटे यांचा किल्ले बनवा स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी, स्नेहल बनकर यांचा गणपती डेकोरेशन स्पर्धेसाठी, अविरत श्रमदानचे वैद्य निलेश लोंढे यांचा आयुर्वेद आणि पर्यावरण संवर्धनासाठी, रांगोळीकार राजश्री भागवत यांचा रांगोळीसाठी, स्वप्नाली भोदगे यांचा विविध स्पर्धांसाठी, रितू सिंग यांचा आरोग्य क्षेत्रासाठी तर अक्षय ढेरे यांचा सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा प्रसार प्रचार करण्यासाठी सदिच्छा दूत म्हणून केलेल्या प्रसिद्धीच्या कार्यासाठी महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या विविध योजना उपक्रम नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी इन्फ्लूएन्सर यांनी सदिच्छा दूत म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद असून महापालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह केले आहे.