पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनकडून महावितरण मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची भेट


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल असोसिएशनला पाचारण केले होते.त्यानुसार संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मुंबईत जाऊन महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आदरणीय लोकेश चंद्र यांची भेट घेऊन विभिन्न विषयांबाबत चर्चा केली.यावेळी सगळ्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे,त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
पुणे जिल्ह्यात वेगवेगळे नियम लावत ग्राहक आणि ठेकेदारांना वेठिला धरले जात असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली. सर्वसमान नियम लावण्याबाबत सूचना देण्याचे आश्वासन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.


महावितरणचा ऑनलाईन पोर्टल हा नाममात्र असून आजही सगळी कागदपत्रे जमा करण्याची सक्ती कार्यालयांकडून केली जात असल्याचे सदस्यांनी नमूद केले,त्यानुसार 100% ऑनलाईनबाबत निर्देश देण्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी मान्य केले.
ट्रान्सफॉर्मर लोडबाबत चुकीचे नियम लाऊन ग्राहकांना त्रस्त केले जात असल्याचा पाढा सदस्यांनी मांडला,त्यानुसार आय टी लोड नुसार नवीन जोडण्या देण्याची पद्धत चुकीची असल्याने त्याऐवजी पूर्वीप्रमाणे असलेली ट्रान्सफॉर्मर मीटर लोड नोंदीनुसार करणेबाबत सूचना देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.

महावितरण मध्ये चुकीची कामे करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांचे लॉक मुख्य कार्यालयाने काढून स्थानिक कार्यालयांना वर्षभरात कधीही तक्रार प्राप्त झाल्यावर बदली करण्याची मुभा द्यावी असे असोसिएशन चे म्हणणे होते.त्यानुसार तक्रार असलेले कर्मचारी आणि अधिकारी असतील तर तसा प्रस्ताव आल्यास तातडीने बदल्या करण्यासाठी मंजुरी देण्यात येईल असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले.मूळ कामाव्यतिरिक्त अतिरिक्त पायाभूत कामे सांगून ठेकेदार आणि ग्राहक यांना त्रस्त करत असलेल्या अधिकाऱ्याबाबत कारवाई करणेसाठी सूचना देण्याचे यावेळी मान्य केले.तसेच प्रादेशिक संचालक कार्यालयाने चुकीचे नियम लाऊन जो गैरकारभार सुरू केला आहे,त्याबाबत येत्या काही दिवसांत कारवाई होईल असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीला संघटना अध्यक्ष गिरीश बक्षी,कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर,उपाध्यक्ष मनोज हरपळे, जावेद मुजावर,सचिव नितीन बोंडे,दिलीप कदम,मनोज सचदेव,संजय मोरे,सूरज भराटे,नटराज बोबडे,प्रदीप पाटील,मंगेश सोनकांबळे आदी उपस्थित होते.
महावितरण कडून संचालक,संचलन आणि सुव्यवस्था अरविंद भादिकर,मुख्य अभियंते प्रवीण परदेशी, दत्तात्रय पडळकर,मनीष वाठ, अविनाश हावरे, दिलीप शेट्टी आदी उपस्थित होते.
बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि बैठकीला वेळ दिल्याबद्दल संघटनेने महावितरणचे आभार मानले.










