चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विठुनामाची शाळा भरली ||
प्रसन्न झाला विठू सावळा ||
विठुराया आणि आषाढीचे महत्व सगळ्या विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने चॅलेंजर पब्लिक स्कूल,पिंपळे सौदागर येथे १६ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शाळेच्या
पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.
विठ्ठल-रखुमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत विठ्ठलनामाचा जयघोष
करत शिवमंदिरापर्यंत दिंडी काढली. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे
वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
विठ्ठल-रखुमाईच्या विधिवत पूजनानंतर विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थी वेद
सावंतने ‘केशवा माधवा हा अभंग पेटी वाजवून सादर केला. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी
तुकाराम महाराजांवर नाटक सादर केले. या कार्यक्रमाला शाळेच्या उपाध्यक्षा अनिता
काटे, तसेच निहारा काटे आणि लीना काटे उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, पालखीपूजन व विठ्ठलाची आरती झाली. अनिता काटेयांनी विद्यार्थ्यांना आषाढीचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी शाकंभरी पाटीलने केले. सोहळ्यासाठी अभिलाषा
सोनार तसेच इतर सर्व शिक्षक सहकारी यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार
पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुविधा महाले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.