पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम महिला बचत गटांना द्या भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि शहरातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनींना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. त्यामुळे या योजनेपासून एकही महिला वंचित राहू नये, असे राज्य सरकारचे धोरण आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत राज्य सरकारचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश आहेत.
त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सुद्धा शहरातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेसाठी शहरातील महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम महापालिका प्रभाग कार्यालय स्तरावर करणार आहे. त्यामुळे प्रभाग कार्यालय स्तरावर महिलांची जास्त गर्दी होऊन त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासनाकडूनही महिलांना प्रभावीपणे मदत होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. तसे झाल्यास योजनेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या अनेक महिला वंचित राहतील. या सर्व शक्यतांचा विचार करून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरातील महिला बचत गटांना सक्रिय करून घेतल्यास एकही महिला योजनेपासून वंचित राहू शकणार नाही.
शहरात काही हजार महिला बचत गट आहेत. या सर्व बचत गटांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहे. प्रशासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम महिला बचत गटांना दिल्यास शहरातील प्रत्येक महिला या योजनेची लाभार्थी ठरेल. तसेच अर्ज भरण्यासाठी गर्दी, महिलांची धावाधाव, ताणतणाव यांपासून शहरातील माता व भगिनींची सुटका होईल. महापालिकेने यापूर्वीच मिळकतकर बिलांच्या वाटपाचे काम महिला बचत गटांना दिलेले आहे. त्यामुळे बचत गटाच्या महिला या थेट प्रत्येक कुटुंबाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम सुद्धा महिला बचत गटांना देण्यात यावे. प्रत्येक अर्जामागे महिला बचत गटांना अनुदान देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”