ताज्या घडामोडीपिंपरी

पहिल्या तिमाहीमध्ये तब्बल ४३२ कोटींचा कर जमा

Spread the love

तब्बल ५४ टक्के मालमत्ताधारकांनी घेतला सवलतींचा लाभ; आयुक्तांकडून जागरूक करदात्यांचे आभार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या तिजोरीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटी रुपयांचा मालमत्ताकर संकलित करण्यात आला. शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी अशा एकूण ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता असून, यावर्षी त्यापैकी ५४ टक्के करदात्यांनी पहिल्या तिमाहीमध्येच मालमत्ताकर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. करदात्यांनी जागरूकपणे कर भरून सवलतींचा लाभ घेतल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जागरूक करदात्यांचे आभार मानले आहेत.

नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबविल्या. त्याच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलतीबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. यामुळे नागरिकांना सवलतीबाबत माहिती होऊन नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच आपला मालमत्ताकर भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सवलतीबाबत जनजागृती झाल्याने परिणामी, सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला.

तब्बल ७३ टक्के करदात्यांनी भरला ऑनलाइन स्वरूपात कर…
शहरातील एकूण मालमत्ताधारकांपैकी ३ लाख ५७ हजार ११ इतक्या मालमत्ताधारकांनी ४३२ कोटींचा कर जमा केला असून त्यापैकी २ लाख ६२ हजार ५२२ इतक्या म्हणजेच ७३ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे.

सर्वाधिक निवासी मालमत्ताधारकांकडून मालमत्ताकराचा भरणा…
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिकेने राबविलेल्या ‘सिद्धी’ प्रकल्पातून सुमारे ४०० महिलांनी मालमत्ताधारकांना बिलाचे वाटप केले, त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत सवलतींचा लाभ घेत कराचा भरणा केलेला आहे, तसेच विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी केली असून त्यामुळे करवसुलीमध्ये सातत्य ठेवण्यात विभागाला यश आले आहे. कर संकलनाच्या १७ झोनपैकी वाकडमध्ये सर्वाधिक ४९ हजार ३६ नागरिकांनी ६८ कोटी, तर पिंपरीनगर झोनमध्ये सर्वात कमी 3 हजार 982 मालमत्ताधारकांनी फक्त 3 कोटींचा कर भरला आहे, तसेच सर्वाधिक ३ लाख ११ हजार ६७ निवासी मालमत्ताधारकांनी तब्बल २६० कोटींच्या कराचा भरणा केला आहे, असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

जागरूक करदात्यांचे मनापासून आभार!
शहरातील सर्व जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्यांनी यावर्षीही पहिल्या तिमाहीमध्ये कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. त्याबद्दल सर्व जागरूक करदात्यांचे मनापासून आभार मानतो. शहरातील करदात्यांसाठी विभागाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत कराचा भरणा केल्याने शहराच्या प्रगतीमध्ये करदात्यांचा मोलाचा वाटा आहे. नागरिकांनी येत्या काळामध्येही शहराच्या प्रगतीसाठी कररूपी योगदान द्यावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

विभागाच्या सांघिक कामगिरीमुळे करसंकलनामध्ये सातत्य!
करसंकलन विभागाने गतवर्षीपासून करवसुलीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. यामुळे नागरिकांमध्ये कर भरण्यामध्ये उत्साह निर्माण झाला असून, नागरिक पहिल्या तिमाहीमध्येच कर भरून त्यावर सवलतीचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामुळे करसंकलनामध्ये गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. नावीन्यपूर्ण कल्पना व उपक्रमांच्या सांघिक कामगिरीमुळे करसंकलनामध्ये आम्ही सातत्य राखून नागरिकांना पहिल्या तिमाहीमध्ये कर भरण्यासाठी प्रवृत्त करू शकलो आहोत.
– प्रदीप जाभंळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना नागरिकांचा कररूपी सकारात्मक प्रतिसाद!
करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी जनजागृतीद्वारे, एसएमएसद्वारे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या तिमाहीमध्येच कर भरण्यास प्राधान्य दिले आहे. मालमत्ताकरावरील सवलतींची माहिती व मालमत्ताकराचे बिल वेळेवर पोहोचल्याने नागरिकांनी यावर्षीही पहिल्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला आहे. करसंकलन विभागाने प्रकल्प ‘सिद्धी’ उपक्रमांतर्गत बिलांच्या केलेल्या वाटपाचा यामध्ये मोलाचा वाटा असून, विभागाने प्रत्येक आघाडीवर घेतलेल्या पुढाकारामुळे यावर्षी ४३२ कोटींचा कर जमा झाला आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून सवलतींचा लाभ घेतला, यामुळे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
– नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button