राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नीट परीक्षार्थी विद्यार्थ्याला उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे कॉम्प्युटर संच
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे होतकरू नीट परीक्षार्थी विद्यार्थी कु.समीर महादेव धनवे याला कॉम्प्युटर संच प्रदान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके , स्कूल शूज यांचे वाटप करण्यात आले.
पिंपळे सौदागर येथे राहणारा कु.समीर महादेव धनवे ह्याला इ.१० वी ला ८१% गुण प्राप्त असून , त्याचे शालेय शिक्षण अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. सध्या तो , औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत असून , मेडिकल प्रवेश परीक्षा ‘नीट’ ची तयारी करत आहे. या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत व्हावी म्हणून , उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे कॉम्प्युटर संच भेट देण्यात आला. तसेच पिंपळे सौदागर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय वह्या , पुस्तके आणि स्कूल शूजचे वाटप देखील यानिमित्ताने करण्यात आले.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या , “लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अभूतपूर्व कार्य केले. सक्तीचे शिक्षण करणारे स्वातंत्र्यपूर्व भारतातील पाहिले संस्थान म्हणून कोल्हापूरचा सन्मानाने उल्लेख केला जातो. विविध जाती-धर्माच्या मुलां-मुलींसाठी हॉस्टेल शाहू महाराजांनी उभारले. छत्रपती शाहू महाराजांचे हेच कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी करून आपला आर्थिक उत्कर्ष साधावा असे मी आवाहन करते.”
विठाई वाचनालयाचे रमेश वाणी म्हणाले , “मागेल त्याला शैक्षणिक मदत ही उन्नती सोशल फाऊंडेशनची प्राधान्याने भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशन कटिबद्ध असून , फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली असून, यापुढेही हा मदतीचा ओघ असाच सुरू राहणार आहे.”
लाभार्थी विद्यार्थी कु.समीर महादेव धनवे म्हणाला , “माझी आर्थिक स्थिती अतिशय बेताची असून , वडील मोलमजुरी करून आमचे घर चालवतात. मी सध्या मेडिकल कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ‘नीट’ ची तयारी करत असून , देशपातळीवर या टेस्ट साठी सराव चाचणी ही ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत. यासाठी मला कॉम्प्युटरची आवश्यकता होती. मी अनेक राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींकडे याची मागणी केली मात्र , केवळ कुंदाताई भिसे आणि उन्नती सोशल फाऊंडेशन यांनीच माझी गरज पूर्ण केली. मी कुंदा भिसे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो ”
याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे ,विठाई वाचनालायचे सुभाष पवार , रमेश वाणी , ज्येष्ठ नागरिक संघांचे अनिल कुलकर्णी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे सदस्य आदी उपस्थित होते.