आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा शुक्रवारी प्रदर्शित होणारा ‘दिंडी’ चित्रपट सर्वांसाठी विनामूल्य

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी असून वारीची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहर हे जगदगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माउली तसेच श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आषाढी वारी काळात संपूर्ण शहर वारीमय होऊन जाते. यंदा यावेळी आषाढी वारी दि. २८ जून २०२४ रोजी प्रस्थान करणार आहे.
आषाढी वारी या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ३३९ व्या आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दि. २७ जून २०२४ रोजी ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील दिंडी प्रमुख व भजनी मंडळ यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या वेळी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘दिंडी’ हा चित्रपट सर्वांसाठी विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.
नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवीत असते. या कार्यक्रमाद्वारे वारकरी बंधू आणि आणि भजनी मंडळ यांच्या कार्याप्रती कृतज्ञता आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा नाट्य परिषदेचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर दिंडी या चित्रपटातून महाराष्ट्राची समृद्ध असणारी दिंडी या परंपरेविषचे अनेक महत्वाचे पैलू ‘दिंडी’ या चित्रपटातून उलगडणार आहेत. सदर कार्यक्रमात हा चित्रपट सर्वांसाठी विनामुल्य प्रक्षेपित होणार आहे.












