त्वरा करा..! कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त 12 दिवस





पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सिध्दी उपक्रमा अंतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ता धारकांना बिलांचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. त्यामुळेच 2024-25 या आर्थिक वर्षातील अडीच महिन्यांत 3 लाख 9 हजार 233 मालमत्ता धारकांनी 362 कोटी 12 लाख रुपयांचा महसूल महापालिका तिजाेरीत जमा केल्याची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांना विविध कर सवलती देण्यात येत असून या सवलतींची 30 जून मुदत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कर भरण्याकडे मालमत्ता धारकांचा कल असताे. महापालिकेच्या वतीने कर संकलनासाठी 17 झोन आहेत. तसेच ऑनलाईनही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेक नागरिक रोखीने कर भरत आहेत. त्यामुळे कर संकलन कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची मोठी गर्दीही होत आहे. महापालिकेने सकाळी पावणेदहा ते सायंकाळी 6 या वेळेत कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपर्यंत जास्तीत-जास्त मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा करावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
अडीच महिन्यातच पन्नास टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर
शहरातील मालमत्ता धारकांनी वेळेवर कर भरावा, यासाठी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने विविध माध्यमातून माेठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. कर थकीत ठेवल्यास त्यावर दंडाची रक्कम वाढतच जाते, त्यामुळे वेळेत कर भरणे कधीही मालमत्ता धारकांच्या हिताचेच असल्याचे पटवून देण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या अडीच महिन्यात 6 लाख 28 हजार मालमत्ता धारकांपैकी 3 लाख 9 हजार 233 मालमत्ता धारकांनी आपला कर भरणा केला आहे.








