ताज्या घडामोडीपिंपरी
“वृक्षसंवर्धनामुळे आत्मिक आनंद मिळतो!” – ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते विश्वास साळुंखे
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वृक्षसंवर्धनामुळे आत्मिक आनंद मिळतो!” असे मत ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते विश्वास साळुंखे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना विश्वास साळुंखे बोलत होते. सेवानिवृत्त महापालिका नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, खजिनदार रवींद्र झेंडे, गोलांडे इस्टेट मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थित होती.
विश्वास साळुंखे पुढे म्हणाले की, “सहा वर्षांपूर्वी घोरावडेश्वर डोंगरावर पहिल्यांदाच एका वटवृक्षाचे रोपण केल्यावर मनस्वी आनंद झाला. त्यानंतर दररोज पहाटे पाच वाजता घोरावडेश्वर परिसरात वृक्षांच्या सान्निध्यात विहार करण्याचा परिपाठ ठेवला आहे. दरम्यानच्या काळात वृक्षारोपण केलेल्या सुमारे पंचावन्न वृक्षांच्या सहवासामुळे दररोज आत्मिक आनंदाचा लाभ घेतो आहे!” राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून, “सुमारे तेरा वर्षांपासून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या परिसरात वृक्षारोपण करण्यात येत असून ज्येष्ठ नागरिक वृक्षसंवर्धनासाठी आवर्जून वेळ देतात. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वाळवंटांचे हरितकरण’ या विषयावर काम करण्यात येणार आहे!” अशी माहिती दिली. प्रभाकर नाळे यांनी आपल्या मनोगतातून, “पर्यावरण संवर्धनाबाबत ‘थिंक ग्लोबली ॲण्ड ॲक्ट लोकली’ या उक्तीनुसार आपण काम करूया!” असे आवाहन केले. ज्ञानेश्वर खेडकर यांनी संतवचने उद्धृत करीत आपल्या संस्कृतीतील वृक्षमहिमा अधोरेखित केला.
यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. प्रदीप वळसंगकर, नृसिंह पाडुळकर, सूर्यकांत क्षत्रिय, माधव जोशी, सुनंदा माटे, प्रेमलता कलाल, पूनम गुजर, सरिता पाळंदे, अश्विनी कोटस्थाने, प्रभाकर काढे, शिवाजी कांबळे, श्याम ब्रह्मे, सरिता कुलकर्णी, शुभांगी भिडे, दीक्षान्त रणधीर यांनी संयोजनात सहकार्य केले. रवींद्र झेंडे यांनी आभार मानले.