कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांना “उत्कृष्ट सायकल सेवा पुरस्कार- २०२४” प्रदान


जागतिक सायकल दिनानिमीत्त लुधियाना येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याहस्ते गौरव



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय सायकल उत्पादक संघाच्यावतीने (ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांना (नागरी गतिशीलता) तिस-या “उत्कृष्ट सायकल सेवा पुरस्कार- २०२४” या पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक सायकल दिनानिमित्त दि. ३ जून २०२४ रोजी लुधियाना येथे पंजाब प्रशासक आणि यूटी, चंदिगडचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी, ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य मुंजाल, पुरस्कार समितीचे अध्यक्ष ओंकार सिंह पाहवा, पुरस्कार समितीचे सचिव डॉ. के.बी.ठक्कर, उपाध्यक्ष ऋषी पाहवा आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सायकलिंग आणि समुदाय सहभागतेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. भारतात टिकाऊ गतिशीलता प्रोत्साहित करण्यात ते आदर्श व्यक्तीमत्व म्हणून काम करत आहेत. तसेच सायकलिंग समुदायवर सकारात्मक परिणाम झाला आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर टिकाऊ गतिशीलता, त्यात सायकलिंगचा समावेश असलेल्या क्षेत्राचा प्रचार केल्याबददल ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनमार्फत यंदाचा “उत्कृष्ट सायकल कार्य सेवा पुरस्कार- २०२४” प्रदान करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांना सायकल क्षेत्रातील “उत्कृष्ट सायकल कार्य सेवा पुरस्कार- २०२४” मिळाल्याबददल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांचे अभिनंदन केले.
बापूसाहेब गायकवाड यांनी सायकलिंग आणि टिकाऊ शहरी गतिशीलतेला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने शहरी रस्त्यांच्या स्वरूपात मोठे परिवर्तन झाले आहे. स्ट्रीट स्केप प्रोजेक्ट सारख्या आघाडीच्या उपक्रमांद्वारे आणि इंडिया सायकल्स फॉर चेंज आणि स्ट्रीट्स फॉर पीपल यासारख्या राष्ट्रीय आव्हानांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
श्री. गायकवाड यांनी सायकल आणि पादचारी पुरक धोरणाची २०२१पासून अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या अथक समर्थनाने आणि संघटनात्मक कौशल्यांमुळे पीसीएमसी ही टिकाऊ वाहतुकीच्या आघाडीवर आली आहे, ज्यामुळे हरित सेतू प्रकल्पांसाठी आंतर राष्ट्रीयस्तरावरील ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स (बीआयसीआय) हा पुरस्कार मिळाला आहे. मागील वर्षी शहराला पादचारी व सायकल पुरक धोरणाला केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने प्रथम पुरस्कार देवून गौरविले आहे. या सर्व बाबींमध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब गायकवाड यांनी उत्कृष्ठ कामगीरी बजावली आहे.








