ताज्या घडामोडीपिंपरी

राजन लाखे ‘इंद्रायणी साहित्य सेवा पुरस्कारा’ने सन्मानित

Spread the love

“साहित्याचा आत्मा म्हणजे काव्य!”

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “कविता करणे ही कवीला लाभलेली मौलिक देणगी आहे, जिचे कवीने जतन केले पाहिजे. शेवटी कविता ही साहित्याचा आत्मा आहे, तिला साहित्यात परमोच्च स्थान असल्याने तिचा पाईक होताना साहित्याची मनोभावे आराधना केली पाहिजे!” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांनी केले. इंद्रायणी साहित्यपीठ, देहू आयोजित वार्षिक बक्षीस वितरण सोहळा २०२४ नुकताच देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पार पडला त्यावेळी लाखे बोलत होते. यावेळी राजन लाखे यांना २०२४ सालचा राज्यस्तरीय ‘इंद्रायणी साहित्यसेवा पुरस्कार’ देहू देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, प्रा. डॉ. सुरेश वाकचौरे आणि साहित्यपीठाचे अध्यक्ष डॉ. अहेफाज मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

“आजकालच्या मानवाला कोणत्याही गोष्टीत सुख मिळत नाही; परंतु ऐहिकाच्या पलीकडे जाऊन कवित्व करणारी माणसे खरी भाग्यवंत आहेत, असे भाग्य आपणा सर्वांना लाभले आहे, त्यामध्ये राजन लाखे एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानातून ‘बकुळगंध’सारख्या ग्रंथामुळे नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे!” असे मत देहू देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात देहू येथे ‘इंद्रायणी आहे साक्षीला’ या उपक्रमातील – राजेंद्र कांबळे, रूपाली सोनवणे, अश्विनी लिके, प्रीतम फिसरेकर, संतोष गाढवे, मीनल साकोरे, ॲड. गणेश गायकवाड पाटील, तन्वी फिसरेकर, सौरभ आहेर, कमल आठवले, अरुण कांबळे, वसंत हांडीबाग, बालकवी स्वरूप मराठे, भीमशाहीर प्रकाश गायकवाड, श्रीधर अंभुरे तसेच इंद्रायणी काव्यसंध्या मधील – डॉ. प्रशांत पाटोळे, विश्वेश्वर बोडखे, विलास अतकरी, बाबा ठाकूर, गुलाबराजा फुलमाळी, सुरेश धोत्रे, अशोक वाघमारे, दीपाली खामकर, दत्तात्रय पोवार, कवी वसंत जावळे, भूषण भानुशाली, गजानन उफाडे, हृषीकेश कोल्हे, भाग्यलक्ष्मी क्षीरसागर, जनार्दन वारकर या कवींच्या उत्कृष्ट कवितांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले. डॉ. मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. गजानन उफाडे यांनी सूत्रसंचालन केले. रमाकांत पडवळ यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button