पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज
मतदान अधिकारी कर्मचारी यांना केंद्रनिहाय साहित्य वाटप होणार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड ऑटोक्लस्टर मधील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी करणेत येणार आहे.
३३ मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ या जागे मध्ये होणार आहे.
साहित्य वाटप करण्याकरीता १०२ व स्वीकृतीसाठी ९७ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारी सकाळी १६ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात करणार आहेत. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात येणार आहे.
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये ७३ बसेस आणि ०१ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे. मतदान अधिकारी कर्मचारी यांचे वाहनाचे पार्किगंची सोय करणेत, आलेली आहे. तसेच अग्निशामक दलाचे वाहन, पाण्याचा टॅंकर, शीघ्र कृती दलाचे पथक,वैद्यकीय पथकासह रूग्णवाहिका उपलब्ध करणेत येणार आहे.
या मतदार संघामध्ये एकूण ३,७३,४४८ मतदार असून ४०० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे २४०३(राखीवसह) अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक बसला पोलीस बंदोबस्त असून जीपीएस प्रणाली अद्यावत ठेवली आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी सुमारे २०% मतदान अधिकारी कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या ४०० मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे बसविणेत आलेले आहे. मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत तिसरे व अंतिम प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुक मतदानाच्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावावा.
– अर्चना यादव सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघ.
पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघ.
एकुण मतदार – ३,७३४४८
पुरूष मतदार – १,९६,४३०
स्री मतदार – १,७६,९८८
तृतीयपंथी मतदार – ३०
मतदान केंद्र – ४००
केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) – ४००
मतदान अधिकारी/कर्मचारी – २४०३ (राखीवसह)
ठिकाणे /शाळा इमारती – ८५
सेक्टर ऑफीसर – ४५
मास्टर ट्रेनर – १०
एकमेव मतदान केंद्र – १ कमलनयन बजाज हायस्कुल, संभाजीनगर
युवा संचलित मतदान केंद्र – १ मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालय पिंपरी
खोली क्र १
महिला संचलित केंद्र – १ पि.चि.म.न.पा, कमला नेहरू हिंदी प्राथमिक शाळा
(मुले व मुली) पिंपरी नगर, खोली क्र.१
दिव्यांग संचलित मतदान केंद्र – १ कामायनी मतिमंद मुलांची शाळा से. क्र २४ खोली क्र १