ताज्या घडामोडीपिंपरी
“भारताची वाटचाल कलियुगातून सत्ययुगाकडे!” – सामाजिक चळवळीचे अभ्यासक तुषार दामगुडे
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भारताची वाटचाल कलियुगातून सत्ययुगाकडे होत आहे!” असे मत प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक तुषार दामगुडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण, येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेतील ‘सांप्रतकालीन सामाजिक – राजकीय व्यवस्था व अवस्था’ या विषयावर ऋषिकेश ‘ऋषि’ यांनी तुषार दामगुडे यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून मुक्तसंवाद साधून द्वितीय पुष्पाची गुंफण केली. टी. जे. एस. बी. बॅंकेचे व्यवस्थापक भूषण वझे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव सागर पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
तुषार दामगुडे परखड आणि मोकळेपणाने आपली भूमिका मांडताना म्हणाले की, “कल्याणकारी राज्य ही एक आदर्शवत संकल्पना आहे. अर्थात ती कालसापेक्ष आहे; पण तरीही आजची जगण्याची परिस्थिती खूप सुसह्य झाली आहे. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. हिंदूंना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात न्यूनगंड वाटेनासा झाला आहे, हा खूप मोठा बदल आहे. हिंदूंचे एकीकरण हा काही व्यक्ती, समूह आणि संघटना यांच्यासाठी चिंतेचा विषय असल्याने काही नगण्य व्यक्तींचे उदात्तीकरण त्यांच्याकडून केले जाते. समाजमाध्यमे स्थानिक पातळीवरील काही सुमार दर्जाच्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा मोठी करण्याचे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. याशिवाय सातत्याने समाजात नकारात्मकता पसरविण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या माहितीची शहानिशा आपण केली पाहिजे. लेखणी हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे; आणि इंटरनेटवर सर्व प्रकारच्या माहितीचा स्त्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे या गोष्टींचा सकारात्मक वापर करून, समविचारी गट एकत्र येऊन लोकप्रतिनिधींकडून आपण समाजव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकतो. राजकारण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे घरात बसून, राजकारणावर फक्त टीका करून परिस्थितीत हवा तसा बदल करता येणार नाही. त्यासाठी मतदानच केले पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती, समाजसुधारकांच्या चळवळी ही महाराष्ट्राची जमेची बाजू आहे; तर विविध स्थानिक पक्षांच्या भाऊगर्दीमुळे राजकारणाला निर्नायकी अवस्था प्राप्त झाली आहे. यासाठी सामान्य माणसांनी नीरक्षीरविवेक दाखवून समाजकारणात सक्रिय झाले पाहिजे. जोपर्यंत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील; तोपर्यंत हिंदुधर्माला कोणताही धोका नाही!”
प्रबोधन मंचाच्या वतीने प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १००% मतदान करण्याचे आवाहन केले. संपदा पटवर्धन आणि पल्लवी बोंडेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मनीषा मुळे यांनी व्यासपीठ व्यवस्था सांभाळली. आदित्य कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश सगदेव यांनी आभार मानले.