ताज्या घडामोडीपिंपरी
“स्वतःचे मन जिंकता आले पाहिजे!” – ॲड. मयूरी पांचाळ
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वतःचे मन जिंकता आले पाहिजे मग जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्य वाटणार नाही!” असा संदेश ॲड. मयूरी पांचाळ यांनी (बुधवार, दिनांक ०१ मे)
विद्यार्थ्यांना दिला. क्रांतिवीर चापेकर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्यावतीने महाराष्ट्रदिन आणि सेवापूर्ती सोहळ्यात ॲड. मयूरी पांचाळ यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी पाटील, माधुरी कवी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सभासद सुभाष जोशी, गतिराम भोईर तसेच स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सेवानिवृत्त उपशिक्षिका पुष्पा जाधव, दिनेश पेडणेकर, कृष्णानंद नाईक, सत्कारमूर्ती दीपाली नाईक आणि त्यांचे कुटुंबीय, माजी विद्यार्थी सौरभ जोशी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रदिनानिमित्त इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सार्थकी जाधव आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थी पार्थ पवार यांनी सुंदर शब्दांत मनोगत व्यक्त केले. उपशिक्षिका छाया सुरवसे यांनी महाराष्ट्रदिनाची माहिती दिली. शुभांगी पाटील यांनी मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती दीपाली नाईक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी “जय जय महाराष्ट्र माझा…” या महाराष्ट्रगीताचे समूहगायन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात ३८ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या उपशिक्षिका दीपाली नाईक यांचा मान्यवरांकडून कुटुंबीयांसह हृद्य सत्कार करण्यात आला. श्वेता उपाध्ये, संध्या कुलकर्णी, पुष्पा जाधव या उपशिक्षिकांसह मान्यवरांनी अभीष्टचिंतनपर मनोगते व्यक्त करून नाईक यांना शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका सरला पाटील यांनी “गुरुवरा दिन हा निरोपाचा…” या सेवानिवृत्तीपर गीताचे गायन केले. सत्काराला उत्तर देताना दीपाली नाईक यांनी आपल्या सेवा कालावधीतील आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.
प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात सहकार्य केले. उपशिक्षक सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी आभार मानले.