यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव आणि प्राधिकरण येथील छत्रपत्ती शिवाजी महाराज जलतरण तलाव नागरिकांसाठी तात्काळ खुला करा – सचिन चिखले
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव आणि प्राधिकरण येथील छत्रपत्ती शिवाजी महाराज जलतरण तलाव नागरिकांसाठी तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. लवकरात लवकर हे जलतरण तलाव खुले न झाल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील चिखले यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर लोटले आहे. तरी देखील प्रशासनाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. काम पूर्ण झाले असताना हा तलाव नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आलेला नाही. सध्या उन्हाळ्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जलतरण तलाव चालू करण्याची मागणी होत आहे.
मागील वेळेस प्रशासनाने दि. ४/३/२०२४ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, पुढील १५ दिवसात जलतरण तलाव चालू करण्यात येईल. परंतु तसे झालेले नाही, तरी वरील गोष्टीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या हितासाठी लवकरात लवकर कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव वापरासाठी खुला करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चिखले यांनी दिला आहे.
दरम्यान सचिन चिखले यांनी आज (दि.२३) रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त पंकज पाटील व रंगराव कराडे यांच्यासह जलतरण तलावाची पाहणी केली. पुढील ४ ते ५ दिवसात तलाव चालु करणार आहे असे आश्वासन त्यांनी सचिन चिखले यांना दिले आहे.