मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील घटनेची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल; प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा
तात्काळ उपाययोजना करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला दिल्या सूचना
मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलला आज सायंकाळी भेट दिली. येथील ५० हुन अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही भेट दिली आहे. यावेळी, कला शिंदे, शालिनी सुर्वे, ऍड. जाधव, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, उपकुलसचिव अशोक घुले, विद्यापीठ अभियंता छाया नलवडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाधित विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना आधार दिला. यावेळी विद्यार्थिनींनी डॉ. गोऱ्हे यांना वसतिगृहातील परिस्थितीबाबत माहिती देऊन परिसरात अनेक सुधारणा होणे आवश्यक असल्याचे सांगितले, त्यानुसार डॉ. गोऱ्हे यांनी विद्यापीठाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना केल्या. त्यामध्ये विद्यार्थिनींच्या मागणीनुसार डॉ. गोऱ्हे यांनी पुढील गोष्टींची गरज असल्याचे लक्षात आणून दिले,
१)टँकरद्वारे जे पाणी येते त्याची तपासणी होणे आवश्यक आहे.
२) पाणी शुद्धीकरण करण्याचे यंत्र देखील तपासण्यात यावे.
३) तसेच जेवणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १०-१० मुलीचा ग्रुप तयार करून एका प्रतिनिधीची नेमणूक करावी.
४) वसतिगृहाच्या प्रत्येक खोल्यांमधील दुरुस्तीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात याव्यात.
वसतिगृहातील सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण तात्काळ करून घेण्यात यावे.
विद्यार्थिनींची तब्येत खराब होते आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कारणे न देता योग्य ती दखल घेऊन उपाययोजना कराव्यात.
अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी विद्यापीठ प्रशासनाला केल्या आहेत. विद्यापीठाच्यावतीने लवकरच योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, याबाबतचा सविस्तर अहवाल महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना पाठविणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.