बारणे यांच्या ‘हॅटट्रिक’साठी महायुतीचे युवा शिलेदार रणांगणात
देशातील युवाशक्ती पंतप्रधान मोदींच्या पाठीशी – पूर्वेश सरनाईक
बलशाली भारतासाठी युवकांचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा – पूर्वेश सरनाईक
काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महायुतीचे युवा शिलेदार आता प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. युवकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच लोकसभेत अभूतपूर्व बहुमतासह पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास युवा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
महायुती युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल (शुक्रवारी) संध्याकाळी काळेवाडी रहाटणी येथील विमल गार्डन बँक्वेट हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास शिवसेना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रदेश सचिव किरण साळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महामंत्री सुनील मेंगडे, सरचिटणीस अनुप मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस तसेच तुषार हिंगे, मनसे शहर अध्यक्ष अनिकेत प्रभू, आरपीआई शहर अध्यक्ष सुजित कांबळे, युवासेना कोर कमेटी रुपेश कदम, रासपा शहर अध्यक्ष अजित चौगुले, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष शेखर काटे, वर्षा जगताप, रितू कांबळे, तेजस्विनी कदम, माऊली जगताप, सागर पाचर्णे, सचिन घोटकुले, रघुवीर शेलार आदी पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वेश सरनाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये कौशल्य विकासावर भर देत तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जगातील एक बलशाली राष्ट्र म्हणून भारत नावारूपाला येत आहे. देशातील युवकांचे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त मोदी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी देशातील युवाशक्ती त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे.
खासदार बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असणार आहे. त्यामुळे सर्व युवकांनी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावावी, असे आवाहन सूरज चव्हाण यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पूर्ण युवाशक्ती खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
मेळाव्याचे संयोजन विश्वजीत बारणे यांनी केले होते.