ताज्या घडामोडीपिंपरी
आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या गाळेधारकांनी घेतली मतदान करण्याची शपथ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “१३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आम्ही लोकशाही प्रती जागरूक राहू तसेच जात, समुदाय, भाषा वा इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजाऊ ” अशी शपथ आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या १०५ गाळेधारकांनी घेतली तसेच या निवडणूकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त डाॅ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करण्यात येत असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्यानुसार आज पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथील भाजी मंडई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजी मंडईचे तानाजी जगताप तसेच चंद्रकांत काळभोर, पोपट काळभोर, सुनील कदम, लतीफभाई, गोपीनाथ जोगदंड, विजय पाटील, मनोहर पवार, माणिक सुरसे,भारत मांगडे, मारूती तरवडे, आशा खुळे, राणी डोईफोडे आदी गाळेधारक, नागरिक यांनी मतदान करण्याची शपथ घेतली. या भाजी मंडईत रोज चार ते पाच हजार ग्राहक भाजी घेण्यासाठी भेट देत असतात, त्यांनाही १३ मे रोजी होणा-या निवडणूकीत मतदान करण्याबाबत आम्हीही जनजागृती करू आणि लोकशाही उत्सवात सक्रीय सहभागी होऊ असे भाजी मंडई गाळेधारकांनी सांगितले.