होळीपौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन



पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
द्राक्षाच्या हंगामात सलग तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.








