मावळमध्ये मविआचा खासदार होईल, हे खात्रीने सांगतो – संजोग वाघेरे
पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाबाबत अद्याप एकमत झाले नसताना ठाकरे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मावळमधील उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पनवेलमध्ये सभा झाली. यावेळी अनंत गीते यांनी आपल्या भाषणात मावळ लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी म्हटले की, जशी मला रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे, तशीच संजोग वाघेरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात सहा मेळावे झाले आहेत. आज खोपोली, पनवेल, उरणमध्ये मेळावे संपन्न होतील. मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे की, मी रायगडचा खासदार होईनच. पण सोबतच संजोग वाघेरे हेदेखील मावळचे खासदार होतील. अनंत गीते यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने मावळ लोकसभा मतदारसंघातून खरोखरच संजोग वाघेरे यांचे नाव निश्चित केले आहे का, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि ठाकरे गटात प्रवेश केला होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची ठरली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. श्रीरंग बारणे अपयशी खासदार ठरलेले आहेत. त्यांचा मतदारांशी जनसंपर्क राहिलेला नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी, अशी मागणी सुनील शेळके यांनी अजित पवारांकडे केली होती. अशातच आता ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासमोर कोणाला रिंगणात उतरवणार, हे पाहावे लागेल.
मावळमध्ये मविआचा खासदार होईल, हे खात्रीने सांगतो: संजोग वाघेरे
या सभेत संजोग वाघेरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मावळ मतदारसंघाची संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याप्रमाणे मी मावळ, पिंपरी चिंचवड, कर्जत खालापूर मधील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. रुग्णालय चांगले नाही. आधीच्या लोकांनी कोणते ठोस काम केले, हे सांगता येत नाही. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या संबंधी समस्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये महाविकास आघाडीचा खासदार निवडून येईल, याची खात्री मी देतो, असे संजोग वाघेरे यांनी सांगितले.